पुलाचे काम सुरु असल्याने अवजड वाहतुक बाह्यवळण रस्त्याने वळवा; वाहतुक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले
भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरुन सुरु असलेली अवजड वाहतुक बाह्यवळण रस्त्याने वळविण्याची मागणी भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केली आहे. अवजड वाहनांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, वाहतुक कोंडीचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नगर-कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम हाती घेतल्याने पर्यायी रस्त्यावर छोटे पुल उभारुन वाहतुक वळविण्यात आली आहे. मात्र हा पुल अत्यंत अरुंद असून, या पुलावर अवजड वाहन आल्यास मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. सध्या शाळा, महाविद्यालय सुरु झाले असून विद्यार्थी, महिलांना जीव मुठीत धरुन या रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. शहराला जोडणारा हा प्रमुख रस्ता असून, अवजड वाहनामुळे वाहतुक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. नागरिकांच्या सोयी व सुरक्षेसाठी नगर-कल्याण मार्गे शहरात येणारी अवजड वाहतुक बाह्यवळण रस्त्याने वळविण्याची मागणी गाडळकर यांनी केली आहे.
नगर-कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत अवजड वाहने शहरात येऊ देऊ नये. अवजड वाहनामुळे सीना नदीच्या पुलावर केलेल्या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. तर अनेक अपघात घडत असून, परिसरातील विद्यार्थी, पालक व महिला या रस्त्यावरुन जाण्यासही घाबरत आहे. नागरिकांना शहरात येण्यासाठी याच रस्त्यावरुन जावे लागत असल्याने वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी अवजड वाहतुक बाह्यवळण रस्त्याने वळवावी. -दत्ता गाडळकर (शहर सचिव, भाजप)