अहमदनगर-शहरातील उड्डाणपुलावर चांदणी चौक भागातील धोकादायक वळणावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत परिवहन विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. दरम्यान, परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक विनायक साखरे व स्मिता कोले यांनी उड्डाणपुलावरील अपघाती वळणाची समक्ष पाहणी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. त्या अहवालानुसार परिवहन विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिलेल्या पत्रात काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलावरील त्या धोकादायक वळणाच्या सुरूवातीलाच वेग मर्यादेबाबत फलक ठळकपणे लावण्यात यावेत.
तीव्र अपघाती वळणाच्या ठिकाणी काँक्रिटच्या संरक्षक भिंतीची शक्य तेवढी उंची वाढविण्यात यावी. पुढे अपघात स्थळ व धोकादायक वळण असल्याचे फलक ठळक स्वरूपात लावण्यात यावेत. वाहनांचा वेग कमी करण्याच्यादृष्टीने तीव्र वळणाच्या 200 मीटर आधी रम्बलर स्ट्रीप लावण्यात याव्यात. तसेच पूर्ण उड्डाणपुलावर कॅट आईज व ब्लिंकर्स लावण्यात यावेत. त्याचबरोबर वारंवार होणारे अपघात रोखण्याच्यादृष्टीने तांत्रिकदृष्ट्या यथायोग्य अन्य उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात अशा सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडे पत्राद्वारे केल्या आहेत. या अपघातांबाबत अभय ललवाणी यांनी जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ई- मेलव्दारे पत्र पाठवून लक्ष वेधले होते.