अहमदनगर-स्कूल व्हॅनच्या धडकेत अडीच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सावेडी उपनगरातील प्रेमदान हाडकोत शनिवारी (17 ऑगस्ट) घडली. विराज सचिन शिरसाठ (रा. पाईपलाइन हाडको) असे मयत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी पाईपलाईन हाडको येथील शिरसाठ यांच्या घरासमोर समर्थ शाळेची स्कूल व्हॅन आली होती. या व्हॅनमध्ये विराज शिरसाठ याचा मोठा भाऊ अरिहंत सचिन शिरसाठ (वय 6) हा बसत असताना विराज त्याच्या मागे गेला. त्याच वेळी विराज याला व्हॅनची धडक बसून अपघात झाला. यात जखमी झालेल्या विराज याला उपचारासाठी त्याचे चुलते विजय पोपट शिरसाठ (वय 56 रा. पाईपलाईन हाडको) यांनी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
तेथील डॉ. बोठे यांनी विराजची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तशी माहिती त्यांनी रुग्णालयात नेमणुकीस असलेल्या पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या खबरीवरून शनिवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार प्रियंका राऊत करत आहेत.