नगर – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून ठाणे येथील दोघांना नगर – मनमाड महामार्गावरील देहरे टोलनाका परिसरात बोलावून त्यांना जवळच्या शेतात नेत त्यांच्या कडील रोख रक्कम व मोबाईल असा ५ लाख १० हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना बुधवारी (दि.१४) दुपारी घडली.
याबाबत निखील नरेंद्र सोनी (वय २५, रा. डोंगरीपाडा घोडबंदर रोड, ठाणे) यांनी गुरुवारी (दि.१५) रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोनी हे व्यवसायाने वाहनचालक आहेत. त्यांच्या पुणे येथील वाहनचालक योगेश साळुंके याच्याशी ओळख झाली होती. अनेक दिवस संपर्कात राहिल्याने त्यांच्यात मैत्री झाली होती. एक दिवस साळुंके यांने सोनी यास नगर जवळ माझ्या काही मित्रांकडे सोने असून ते स्वस्तात देण्यास तयार आहेत, असे सांगितले. सदर सोने पाहण्यासाठी फिर्यादी सोनी व त्याचा मित्र असलेल्या साळुंके हे नगरमध्ये आले होते. साळुंके याच्या ओळखीच्या व्यक्तींनी सोनी यास सोन्याचे दागिने दाखविले. त्यानंतर त्यांचा व्यवहार ठरला. फिर्यादी सोनी याने पैशांची व्यवस्था करून रोकड घेवून येतो असे सांगून तो निघून गेला.
पैशांची जुळवाजुळव झाल्यावर तो त्याचा ठाणे येथील मित्र सुनिल कांबळे याला घेवून वाहनाने बुधवारी (दि.१४) दुपारी नगरकडे आला. त्याला साळुंके याने नगर – मनमाड महामार्गावरील देहरे टोलनाक्याजवळील पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या शेतात नेले. तेथे आणखी ३ अनोळखी व्यक्ती होते. तेथे गेल्यावर आरोपी साळुंके व त्याच्या समवेत तेथे असलेल्या अन्य अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी निखील सोनी व त्याचा मित्र सुनिल कांबळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत दमबाजी केली. त्यानंतर त्यांच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेत तेथून पळून गेले.
स्वस्तात सोन्याच्या अमिषाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर निखील सोनी याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी योगेश साळुंके व अन्य ३ अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध बी.एन.एस.२०२३ चे कलम ३०९ (६), ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.