Saturday, January 25, 2025

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; उद्धव ठाकरे म्हणाले

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मोठा विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबई येथे पार पडला. या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अनेक नेते शपथविधीला हजर राहिले नाहीत. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र विरोधकांमधून कुणीही यावेळी उपस्थित राहिले नाही. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतरच्या पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि सचिन अहिर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा मिळाल्या आहेत. यात शिवसेनेला सर्वाधिक २० जागा जिंकता आल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपैकी १० टक्के जागा जिंकणे गरजेचे आहे, असा पायंडा आहे. मात्र एकाही पक्षाला २९ जागा जिंकता आलेल्या नाहीत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीनंतर त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली.


मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बातचीत करताना या भेटीबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जाती, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त ही निवडणूक कशी जिंकली वैगरे हे प्रश्न आहेतच. त्याबाबत जनतेत जाऊन आवाज उचलत राहू.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles