नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून प्रयत्न केले, असा गंभीर दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या रोखठोक या सदरात केंद्रीय राजकारणाबाबत काही मोठे दावे केले आहेत. त्याशिवाय, उत्तर प्रदेशमधील निकालांबाबतही राऊतांनी या लेखाच्या माध्यमातून भाकित वर्तवलं आहे. अमित शाह योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात योगी समर्थकांनी हाक दिल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. “अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला ३० जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचा परिणाम ४ जूनला दिसेल”, असं संजय राऊतांनी या लेखात नमूद केलं आहे.