मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रमात एक असं चित्र पाहण्यास मिळालं जे महाराष्ट्र विसणार नाही. या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे दोन घटक पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही बोलवण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं पाहण्यास मिळालं.
उद्धव ठाकरे ज्यावेळी भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी त्यांनी यावर काँग्रेसच्या उपरण्यावर भाष्य केलं. भाषणाची सुरुवात त्यांनी, “काँग्रेसचे असलात तरीही जमलेल्या माझ्या बंधूनो, भगिनींनो आणि मातांनो” अशी केली. तसंच म्हणाले, “मी आज खरंच काँग्रेसच्या कार्यक्रमाला आलो आहे हे बघायला स्वतःला चिमटा काढून पाहिला. काँग्रेसच्या कार्यक्रमाला असल्याने मी गळ्यात गमछा घातला. तुमचा आदर ठेवला, मान ठेवला. पण उद्या याचा नक्की फोटो येणार. तो फोटो यावा यासाठीच मी काँग्रेसचे गमछा गळ्यात घातला होता. मी इकडे तिकडे काय करतो त्यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. कारण समोरच्यांचं काही कर्तृत्व नाही. दाखवा काय दाखवायचं ते.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्या बाळासाहेब ठाकरे यांची सगळी हयात काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात गेली, ज्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करून शिवसेना स्थापन केली, रुजवली आणि वाढवली; त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे केवळ राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचे उपरणे गळ्यात घालून बसले आहेत. आपली मूळची विचारधारा काँग्रेसच्या पायात आणि काँग्रेसचे उपरणे स्वतःच्या गळ्यात, अशी अवस्था आता उद्धव ठाकरे यांची झाली आहे. अशी पोस्ट भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंचा काँग्रेसचं उपरणं गळ्यात घातलेला फोटोही पोस्ट केला आहे.