एकीकडे भाजप आणि मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना धक्का दिलाय. घाटकोपरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मातोश्रीवर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यामध्ये मनसेच्या माजी शाखा अध्यक्षांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेते प्रवेश केला.
घाटकोपर पूर्वमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मातोश्री येथे उध्दव ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर पूर्व विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रं. १३३ चे माजी शाखा अध्यक्ष संतोष पिंगळे,माजी शाखा अध्यक्ष सुनील भोस्तेकर आणि प्रभाग क्रं. १२५ चे सतीश पवार ह्यांनी आपल्या सुमारे ३०० ते ४०० समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. उध्दव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्ती करण्यात आलेल्या महिला निरीक्षकांची बैठक मातोश्री येथे पार पडली. यावेळी उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरेंनी पुढील दिशा कशी असेल, याबाबत थोडक्यात सांगितले.सर्वांचे शिवसेनेत आणि मातोश्रीत स्वागत आहे. आठ दहा दिवसांपूर्वी निकाल लागला आणि त्यानंतर ही तुम्ही शिवसेनेत येताय. जल्लोषात तुम्ही इकडे येताय, मात्र जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाही. याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही. म्हणजे विजयात काहीतरी घपला आहे. ईव्हीएम मशीन घोटाळा आहे, बरेच घोटाळे आहेत, असे ठाकरे म्हणाले.
तुम्ही सगळे योग्य वेळेला एकत्र आलात. पराभव ज्याच्या जिव्हारी लागतो तेच इतिहास घडवू शकतात. उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे. एक है तो सेफ है असं म्हणतात. हाच प्रश्न मला मराठी माणसांना विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का ? हक्काची मुंबई आपली ओरबाडली जातीये आपण षंढ म्हणून गप्प बसणार का ?