लोकसभेच्या निकालानंतर कुठला पक्ष भाजपासोबत जाईल, हे मी सांगू शकत नसल्याचे शरद पवार यांनी या मुलाखतीत सांगितले. पण सध्या महाराष्ट्रात जशी परिस्थितीत आली आहे, तशी परिस्थिती ओढावल्यास समविचारी पक्षांची मोट बांधण्यात येईल. त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करु. देशाला स्थिर सरकार देण्यासाठी एक समान कार्यक्रम तयार करु आणि जर संधी असेल तर तिचा पूर्ण फायदा घेऊ, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. म्हणजे केंद्रात समविचारी पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल हे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीनंतर देशातील आणि राज्यातील समीकरणं बदलतील. सत्तेच्या सारीपाटावरील चित्र वेगळं असेल. अनेक जण दिशा बदलतील असा दावा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील असा दावा वारंवार करण्यात येत आहे. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील याची अजिबात शक्यता नाही. अजिबातच नाही. उद्धव ठाकरे भाजपा आणि मोदींसोबत जाणार नाहीत, नाहीत, नाहीत असे तीनदा पवारांनी या मुलाखतीत ठासून सांगितले.