जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू, तुम्ही फक्त आम्हाला निवडून आणा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरेपक्षाचे प्रमुख सरकारी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनातून ते बोलत होते.
उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, ही जुनी पेन्शन योजना आपण सगळे मिळून खेचून आणू. तुमची एकजूट पाहता हे सरकार गेल्यातच जमा आहे. आमचे सरकार आणा, जुनी पेन्शन योजना अंमलात आणतो. सरकारच्या योजना राबवणारे तुम्ही आहात, लोकांच्या घराघरात जाऊन तुम्ही सरकारचे काम करता, तरी योजनेच्या पोस्टरवर फोटो या दाढीवाल्यांचे लागतात, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
लाडकी बहीण योजनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना बहीण आहे हे माहीत नव्हेत, निवडणुका जवळ आल्या की यांनी लाडकी बहीण योजना काढली, असा टोला त्यांनी लगावला आहे. करोनाच्या काळात तुम्ही सगळ्यांनी जिवावर उदार होऊन कामे केलीत म्हणून महाराष्ट्र वाचला आहे. तरी सुद्धा हे सरकार तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन देत नाही. आपले सरकार पुन्हा आणा, आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काची पेन्शन मिळवून देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.