नगर – नगर शहरातील मुकुंद नगर परिसरामध्ये राहणाऱ्या ३ वर्षीय बालकाचा रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.४) सायंकाळी घडली आहे. समर इम्रान शेख (रा. इस्लामिया बेकरी जवळ, मुकुंद नगर) असे मयत बालकाचे नाव आहे. तो हौदात पडतानाची घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे.
मुकुंद नगर परिसरामध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास समर शेख हा कॉलनीत खेळत होता. तेव्हा शेजारी असलेल्या शादाब किराणा स्टोअर या दुकानाच्या समोर असलेल्या पाण्याच्या हौदामध्ये तो पडला. तो हौदात पडला त्यावेळी त्याला कोणीही पाहिले नव्हते. बराच वेळ झाला तरी मुलगा घरी ण आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा बराच वेळ सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. बऱ्याच वेळाने काहींचे लक्ष पाण्याच्या हौदाकडे गेल्यावर त्या ठिकाणी तो त्या हौदात पडल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ भिंगार कॅम्प पोलिसांना व महापालिकेच्या अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पाण्यात बुडालेल्या त्या चिमुल्याला बाहेर काढले. त्याचे वडील इम्रान शेख यांनी त्यास बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. बटूळे यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.