पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील हिंगणदरा वस्तीवर मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या सूनेचा पाय घसरून शेततळ्यात पडल्यामुळे तीला वाचवण्यासाठी सासर्याने तात्काळ धाव घेतली. मात्र त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे सून व सासर्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील हिवरा कोरडे येथील मुरलीधर मारुती नवले (वय 70 वर्ष) हे आपल्या मेंढ्या चारत होते. त्यांची सून उज्वला आबा नवले (वय 40 वर्ष) आपल्या मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यावर गेली. शेततळ्यातून पाणी काढताना पाय घसरून त्या शेततळ्यात पडल्या. उज्वला नवले या शेततळ्यात पडल्याचे दिसताच शेजारी मेंढ्या चारणारे सासरे मुरलीधर नवले यांनी धाव घेत शेततळ्यात उडी घेतली. मात्र सासरे मुरलीधर नवले हे वयोवृद्ध असल्यामुळे ते सूनेचा प्राण वाचवण्यासाठी अपयशी ठरले.
या घटनेमध्ये सून व सासर्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती तात्काळ पारनेर पोलिसांना कळविण्यात आली. तोपर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने मुरलीधर नवले व उज्वला नवले यांचे मृतदेह बाहेर काढून पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.