अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी संसदेत २०२४-२५ चे अर्थसंकल्पीय भाषण केले. या भाषणात त्यांनी देशभरात रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान पॅकेजअंतर्गत अनेक योजनांची घोषणा केली. इंटर्नशिप योजना ही त्यापैकीच एक आहे. देशात रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारद्वारे अशा पाच योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. इंटर्नशिप योजनेनुसार एक कोटी तरुणांना देशातील ५०० अग्रगण्य कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. या योजनेतील इंटर्नला मासिक भत्ता, तसेच एक वेळ साह्य रक्कम (इन्सेंटिव्ह) दिली जाईल. या इंटर्नशिप योजनेचा देशातील एक कोटी तरुण-तरुणींना फायदा होईल, असे सरकारचे सांगणे आहे. योजनेनुसार तरुणांना पाच हजार रुपये इतका मासिक भत्ता दिला जाणार आहे. तसेच इंटर्नशिपचा कालावधी पूर्ण करणार्या तरुणांना इन्सेंटिव्हच्या स्वरूपात वेगळे सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. योजनेचा पहिला टप्पा दोन वर्षांचा; तर दुसरा टप्पा तीन वर्षांचा असणार आहे.