केंद्रीय गृहमंत्री आणि भाजापाचे दिग्गज नेते अमित शाह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीतील विजय आणि शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल भाष्य केले आहे.
या पार्श्वभूमीवर अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला की ३० वर्षांच्या निवडणूक निकालाच्या डेटानुसार जो पक्ष लोकसभा निवडणूकीत जे काही होतं, जर काही महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत देखील तोच पॅटर्न पहायला. मग महाराष्ट्रात हा बदल कसा शक्य झाला? अमित शाह म्हणाले की, “तुमच्या विश्लेषणाचा पाया चुकीचा आहे आणि तुमची मेमरीदेखील शॉर्ट आहे. गेल्या निवडणुकीतदेखील नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बहुमत मिळालं होतं. शिवसेना ज्या जागांवर लढली त्या जागा आम्ही लढलो नव्हतो, त्यामुळे आम्ही जिंकू शकत नव्हतो. शिवसेना आमच्याबरोबर होती त्यामुळे त्यांना बहुमत मिळालं होतं आणि आम्हाला संपूर्ण बहुमत मिळालं होतं. मुख्यमंत्री बनण्याच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी विश्वासघात केला. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेशी विश्वासघात केला.”
राज्यात स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल विचारले असता अमित शाह म्हणाले की, “शिंदे नाराज असण्याचं काही कारण नाही. आमच्या जागा खूप जास्त आहेत. मागच्या वेळीही आमच्या जागा जास्त होत्या. पण आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले आणि अडीच वर्ष त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिलो. यावेळी मात्र सुरुवातीपासूनच सांगत आलो होतो की मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीनंतर निश्चित केले जाईल. त्यामुळे कोणी नाराज असण्याची गरज नाही, कोणी नाराजही नाही”.