केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शाह यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत निधन झाले. 65 वर्षीय राजेश्वरीबेन फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वीच त्यांना अहमदाबादहून मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बहिणीच्या निधनानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
अमित शाह रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले होते. शाह यांनी बहिणीवर उपचार सुरू असलेल्या खासगी रुग्णालयात जाऊन बहिणीच्या तब्येतीची विचारपूस केली. शाह आणि मुख्यमंत्री शिंदे हॉस्पिटलमध्ये येताच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रात्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईकही होते. शाह हे जवळपास 2 तास हॉस्पिटलमध्ये बहिणीसोबत होते. अमित शाह यांना भेटण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीही हजर होते. शाह यांचा खासगी दौरा असल्याने ते इतर कुणालाही न भेटता पुन्हा दिल्लीला रवाना झाले. आज त्यांच्या बहिणीच्या निधनाची बातमी समोर आली.