राज्यात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं एकत्र यावं, अशी चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, अशा आशयाचे बॅनर्सही झळकले. अशातच भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही भावांबद्दल बाळासाहेबांची एक इच्छा अपूर्ण राहिल्याचा खुलासा केला आहे. नितीन गडकरी यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंबरोबरची मैत्री आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक केलं. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला, त्यानंतरच्या पहिल्या भेटीत तुम्ही काही सल्ला दिला होता का? असा प्रश्न नितीन गडकरींना विचारण्यात आला. उत्तर देत ते म्हणाले, “बाळासाहेब जेव्हा लीलावती रुग्णालयात होते, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो, त्यानंतर काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. मी भेटलो तेव्हा त्यांनी मला बसायला सांगितलं आणि सगळ्यांना बाहेर पाठवलं. ते मला म्हणाले, ‘नितीन एक काम कर उद्धव आणि राजमध्ये मैत्री कर’. राज यांनी शिवसेना सोडू नये, यासाठी मी खूप प्रयत्न केले. मी उद्धव ठाकरेंनाही खूप वेळा समजावून सांगितलं, मी प्रयत्न केले पण दुर्दैवाने मला त्यात यश आलं नाही.”