अयोध्येतील रामलल्लाचा अंश हिवरे बाजारमध्ये…
पद्मश्री पोपटराव पवारांचा रामजन्मभूमी न्यासद्वारे अनोखा सन्मान
अहमदनगर : अयोध्येत तब्बल 500 वर्षांनंतर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेल्या बालस्वरुप रामलल्लाचा अंश नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये आला आहे. लोकसहभागातून आदर्श हिवरे बाजार गाव घडवणारे पद्मश्री पोपटराव पवार यांचा अनोखा सन्मान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारे करण्यात आला असून, श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा प्रसाद म्हणून ज्या शिळेपासून (काळा पाषाण) अयोध्येतील रामलल्ला मूर्ती घडवली गेली, त्या शिळेचा छोटासा तुकडा व राम पंचायतन असलेले चांदीचे नाणे त्यांना भेट देण्यात आले आहे.
अयोध्येत मागील 22 जानेवारीला भव्य राममंदिरात बालस्वरुप रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. या कार्यक्रमासाठी पद्मश्री पवार यांना विशेष निमंत्रण होते. त्या सोहळ्यात ते सहभागीही झाले होते. या पार्श्वभूमीवर, ज्या काळ्या पाषाणातून रामलल्लांची मूर्ती साकारली, त्या पाषाणाचा शिलांश पद्मश्री पवारांना प्रसाद रुपाने मिळाल्याने प्रत्यक्ष रामलल्ला हिवरेबाजारमध्ये आल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. (दि. १७ एप्रिल) रामनवमीच्या दिवशी या शिलांशाची शोभायात्रा गावातून काढण्यात येणार आहे. तसेच गावात येत्या 16 ते 23 एप्रिल दरम्यान आयोजित श्रीराम कथा निरुपण सोहळ्यात भाविकांच्या दर्शनासाठी तो ठेवला जाणार आहे. त्यानंतरही सार्वजनिक सुट्टी तसेच प्रमुख सणावारांच्या काळात गावातील मारुती मंदिरात तो दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे.
भाग्यांक 9 साधला
ज्वालामुखीतील काही लाव्हा बाहेर न येता तो जमिनीच्या आतच राहतो. तो थंड झाल्यावर त्यापासून काळा पाषाण म्हणजेच गॅब्रो तयार होतो. कर्नाटकातील गॅब्रो उत्तम असल्याने या पाषाणाची निवड अयोध्येतील रामलल्ला मूर्ती घडवण्यासाठी केली गेली आहे. या मूर्तीची झीज होणार नसल्याने पुढील शेकडो वर्षे रामलल्ला तेजस्वी रूपाने भाविकांना दर्शन देणार आहे. याच पाषाणाचा ६ सेंटीमीटर लांब, 3 सेंटीमीटर रुंद व सुमारे दीड सेंटीमीटर जाडीचा तुकडा पद्मश्री पवारांना प्रसाद रुपाने दिला गेला आहे. त्याचे घनफळ 27 घनसेंटीमीटर म्हणजे 2 अधिक 7 मिळून 9 हा भाग्यांक साधला गेल्याची भावना पद्मश्री पवारांची आहे. या शिलांशाच्या रुपाने प्रत्यक्ष रामलल्ला मूर्तीचा अंश घरी आला आहे. समवेत श्रीराम-सीता बसलेले व पाठीमागे भरत-लक्ष्मण उभे आणि पुढे हात जोडून बसलेले हनुमान व शत्रुघ्न…असे श्रीराम पंचायतन चित्र असलेले चांदीचे नाणेही दिले असल्याने आमच्या पवार परिवारासह हिवरे बाजारच्या प्रत्येक रहिवाशाच्या जीवनातील हा अवर्णनीय आनंदक्षण असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आम्ही लोकसहभागातून चराईबंदी, कुर्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, श्रमदान, लोटाबंदी, पाण्याचा ताळेबंद या सप्तसूत्रीतून घडवलेल्या वनसमृद्ध, जलसमृद्ध, मृदसमृद्ध, पशुसमृद्ध (पशु व वन्यजीव), दारिद्रयमुक्त, पुनस्थालांतरीत व सामाजिक सलोखा निर्माण केला आहे. तसेच आदर्श गाव योजना, पानी फौंडेशन, ग्राम सामाजिक परिवर्तन व महाराष्ट्रातील इतरही सामाजिक चळवळीत सहभागी होतो. हिवरे बाजारला आजपर्यंत १५ ते २० लाख लोकांनी प्रत्यक्ष भेटी देऊन विकास कामाची पाहणी करून आपापल्या स्तरावर उपक्रम राबविण्याचे प्रयत्न केले आहेत. या कामांच्या माध्यमातून पोपटराव पवार यांच्या रूपाने गावाच्या व देशाच्या लौकिकात भर घातली जात आहे. त्रेतायुगात प्रभू श्रीरामाने रामराज्याची संकल्पना मांडताना नैसर्गिक साधनसंपत्ती त्यावर अवलंबून असणारे पशु-पक्षी व मानव या सर्वांना १४ वर्षाच्या वनवासात बरोबर घेऊन ग्रामराज्य उभे केले. म्हणूनच त्या काळात सामाजिक, आर्थिक भेदभाव नव्हता आणि मातीच्या सानिध्यात देवत्वाची अधिष्ठाने निर्माण केलेली होती. त्या रामराज्यात जी नैतिक मूल्य होती, तशाच नैतिक मूल्यांची जोपासना होण्यासाठी गावात श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. हिवरे बाजारच्या विकासाचा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाद्वारे हा अनोखा सन्मान आम्ही मानतो व तो गावाच्या लौकिकात भर घालणारा आहे, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
असे झाले रामलल्ला दर्शन…
पद्मश्री पोपटराव पवार यांचे कार्य देशविदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणाहून व्याख्यानांची निमंत्रणेही असतात. दक्षिणेत रामेश्वरमला ते व्याख्यानासाठी गेले असताना 13 डिसेंबर 2023 रोजी त्यांना राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रद्वारे 22 जानेवारी 2024 च्या रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले, त्यानंतर 13 जानेवारी 2024 रोजी कार्यक्रम पत्रिका मिळाली व 22 जानेवारीला ते अयोध्येतील कार्यक्रमास उपस्थित राहिले. तेथून आल्यावर १० मार्च रोजी शिर्डीत व्याख्यान कार्यक्रमास गेले असताना तेथे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारे त्यांना रामलल्ला शिलांश व श्रीराम पंचायत असलेले चांदीचे नाणे भेट देण्यात आले.