गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागांना गारपीटीने चांगलंच झोडपून काढलं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून रब्बी हंगामातील पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश यासह अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय.