शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या ३-४ तासांत अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. त्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो.
दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांतील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज बुधवार आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. कुठे अवकाळी पावसाच्या सरी, तर कुठे तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ आहे. तापमानाचा पारा चाळीपार गेल्याने कमालीचा उकाडा जाणवत आहे.