बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा बसला.
त्यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं असून फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने राज्यातील विविध भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. नगर तालुका आणि पारनेर तालुक्यात मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात रविवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. त्यामुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याशिवाय कांद्याचे पिकही शेतकऱ्यांच्या हातातून गेलं आहे. सरकारने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहेत.
पुणे शहरासह जिल्ह्यात रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पुण्यात रविवारी ४९.२ मी मी एवढ्या पावसाची काल नोंद झाली. पुढील दोन दिवस पुण्यात अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.