बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झालं आहे. उद्या म्हणजे ५ डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मिचौंग चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. मात्र, चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर बाष्प असल्याने पुढील ३ ते ४ दिवसात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात, तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.