प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या यूपीएससी परीक्षेतील गैरव्यवहाराची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांचा कार्यकाळ २०२९ पर्यंत होता. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असून त्याचा पूजा खेडकर प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. मनोज सोनी यांनी एक महिन्यापूर्वीच राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपविला होता. त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला आहे की नाही? याबाबत मात्र काही निश्चित माहिती मिळालेली नाही. यूपीएससीचे सदस्य होण्यापूर्वी मनोज सोनी यांनी गुजरातमधील दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते. पूजा खेडकर यांचे फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक बोगस आयएएस अधिकाऱ्यांची प्रकरणे समोर आली होती. ओबीसी आणि आर्थिक मागस प्रवर्गाचा फायदा घेऊन काहींनी यूपीएससी परीक्षेत लाभ मिळविल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काही अधिकाऱ्यांनी खोटे अंपगत्वाचे प्रमाणपत्र देऊन यूपीएससीची दिशाभूल केली असल्याचे सांगितले गेल. त्यामुळे यूपीएससीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.