Tuesday, April 29, 2025

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बन बँक फसवणूक प्रकरण…आता पोलीस….

अहमदनगर-नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी महत्वाचा पुरावा समजला जाणारा फॉरेन्सिक ऑडिटचा सुमारे एक हजार पानांचा अंतिम अहवाल ऑडिट करणार्‍या मुंबई येथील ठकराल कंपनीच्या प्रतिनिधींनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केला आहे. सदरचा अहवाल तीन खंडात देण्यात आला असून यामध्ये संशयित कर्ज प्रकरणाच्या तपासणीत संचालक मंडळ, कर्ज शिफारस करणारी बँकेची समिती व कर्जदार यापैकी कोणाचा कोणत्या प्रकरणात काय सहभाग आहेत, कोणाच्या काय काय चुका आहेत, कर्ज रकमेचा गैरवापर झाला का, रकमा कोणापर्यंत गेल्या, याची माहिती सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे. संशयितांवर कारवाई करण्यासाठी हा अहवाल महत्वाचा असून यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाला गती येणार आहे.

कोतवाली पोलीस ठाण्यात माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार 28 संशयित कर्ज प्रकरणात घोटाळा व फसवणूक प्रकरणी संचालक मंडळावर गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याचा तपास सुरू आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आर्थिक व्यवहार व कागदपत्रांचा तांत्रिक तपास करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुंबई येथील ठकराल या कंपनीकडून ऑक्टोबर 2022 पासून फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे काम सुरू होते. दरम्यान मागील पंधरवाड्यात नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून दोषी संचालक व त्यांच्या साथीदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर रखडलेला फॉरेन्सिक ऑडिट अहवाल अंतिम करण्याचे काम सुरू झाले. सुमारे 28 कर्ज प्रकरणे व आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत कोणाच्या चुका आहेत, रकमा कोनापर्यंत पोहोचल्या हे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अहवाल अंतिम करून फसवणूक प्रकरणात कोण दोषी आहेत, लाभार्थी कोण आहेत, यांच्या नावांसह अंतिम अहवाल आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर झालेला आहे.

दरम्यान, फॉरेन्सिक अहवालात यापूर्वीच अनेक बाबी समोर आलेल्या आहेत. कर्ज रकमांचा गैरवापर झाल्याचेही स्पष्ट झालेले आहे. फॉरेन्सिक अहवाल हा या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा असून, त्यानुसार पोलिसांकडून कोणत्याही क्षणी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला असून त्यातून समोर आलेल्या अनियमितता, गैरप्रकार व त्यास कोण जबाबदार आहेत, याचा अभ्यास करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. वरीष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा होऊन, कारवाईबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.

– कमलाकर जाधव, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles