काँग्रेसने मोठा निर्णय घेत राहुल गांधी यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. रायबरेलीतून सोनिया गांधी यांच्या जागी राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता रायबरेली लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी विरुद्ध दिनेश प्रताप सिंह अशी लढत होणार आहे. 2004 ते 2024 पर्यंत सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या.
मागील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढली होती. परंतु, भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून मात्र विजयी झाले होते. आता त्यांनी पुन्हा आपल्या पारंपारिक मतदारसंघाकडे मोर्चा वळवला आहे. यंदा त्यांनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघाची निवड केली आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.