पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार; देशाच्या कानाकोपऱ्यात शेतीमाल पाठविणे सहज होणार शक्य
नगर (प्रतिनिधी)- शेतीमालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी वंदे किसान गुडस् ट्रेन देशभरात सुरू करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे एखाद्या पिकांचे अधिक उत्पादन झाले तरी, ते देशाच्या कानाकोपऱ्यात पाठविणे सहज शक्य होणार असून, त्यामुळे शेतीमालाचे भाव कोसळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादित शेतीमाल मोठ्या प्रमाणात पिकला आणि त्याची बाजारात मोठी आवक झाली तर मागणी पुरवठ्याचा समतोल मोडीत निघतो. त्यामुळे शेतीमालाचे भाव उत्पादन खर्चाच्या खाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन त्याचे श्रम व पैसा वाया जातो. अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग कर्जबाजारी होऊन निराशेपोटी आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. यावर अर्थशास्त्रातील मागणी पुरवठ्यामध्ये समतोल तयार करणे हाच एक महत्वाचा उपाय असल्याचे संघटनेची भूमिका आहे.
वंदे किसान गुडस् ट्रेनमुळे देशाच्या एका कोपऱ्यात पिकलेला माल देशाच्या दुसऱ्या हजारो किलोमीटर दुरच्या बाजारात वेगवान वाहतूकीमुळे पोहचू शकणार आहे. विशेष म्हणजे पालेभाज्या, फळभाज्या आणि दुधासारख्या नाशवंत वस्तू अतिवेगाने वाहून नेणाऱ्या यंत्रणेची भारतात फार मोठी गरज आहे. विशेषतः हरितक्रांती नंतर ही शेती उत्पादनाची वाहतूक अतिशय तीव्र झालेली आहे. वंदे किसान गुड्स ट्रेन यामध्ये शितसाखळी किंवा कोल्डचेन पद्धतीच्या सुद्धा सोयी असल्या पाहिजे. ज्यामुळे नाशवंत माल जास्त काळ टिकण्यास मदत होईल.देशात मोदीची गॅरंटीचा खुप प्रचार प्रसार करण्यात आला. या संघटनांनी देशातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी वंदे किसान गुडस् ट्रेनची मागणी केली आहे. वंदे किसान गुडस् ट्रेन देशभरात सुरू होण्यासाठी ॲड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, प्रकाश थोरात, ओम कदम, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.
वंदे किसान गुडस् ट्रेन देशभरात सुरू करण्याची मागणी..देशाच्या कानाकोपऱ्यात शेतीमाल
- Advertisement -