अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होणार आहे. आक्षेप घेतलेल्या मतदान केंद्रावर मशीनची मेमरी रिकामी करून पुन्हा मतदान प्रक्रिया म्हणजेच मॉकपोल राबवली जाणार आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी ४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर १० जून रोजी मतदारसंघातील ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता या मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी केली जाणार आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मतदान यंत्राची तपासणी करून मतमोजणी होणार आहे. ज्या ४० मतदान केंद्रावर सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्या ठिकाणी व्हीव्हीपॅटची मोजणी होणार आहे. ही मोजणी आणि पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
अशी केली जाणार मतदान यंत्राची पडताळणी –
– सुरुवातीला ईव्हीएम बनवलेल्या कंपनीचे अधिकारी मशीनची तांत्रिक तपासणी करतील.
– यानंतर आक्षेप घेतलेल्या ४० यंत्राची मेमरी रिकामी केली जाईल.
– यानंतर शेजारीच तयार केलेल्या मतमोजणी कक्षात पेपर स्लीप (व्हीव्हीपॅट) आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी केली जाणार आहे.
– एका मशीनमध्ये प्रत्येकी १ ते १४०० मते टाकता येणार आहेत. किती मते करायचे हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना आहेत.
– ही सर्व प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगरानीत पार पडणार आहे.