खत घेण्यासाठी रांगेत उभे राहून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी स्वत: रांगेत उभे राहण्याऐवजी चक्क चप्पल-बुटांचे जोड ठेवले आहेत. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही बूट आणि चपलांच्या रांगेचा व्हिडीओ शेअर करून गुजरात मॉडेलवर सडकून टीका केली आहे.
हा व्हिडीओ कच्छ जिल्ह्यातील रापर तालुक्यातील असल्याचे सांगितले जात आहे; ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी खत घेण्यासाठी आले होते. खतासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे करण्यात आले; पण कडक उन्हात उभे राहून हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी मग रांगेत स्वत: उभे राहण्याऐवजी तेथे आपल्या चप्पल किंवा बुटाचे जो़ड ठेवले आणि ते सावलीचा आसरा घेत रस्त्यावर बसले. आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून, लोकांच्या त्यावर वेगवेगळ्याा प्रतिक्रिया येत आहेत.