राशीन : कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी येथील शेतकऱ्याचे शेततळ्याचे दीड लाख रुपये अनुदान देण्यासाठी पाच हजाराची लाच स्वीकारणाऱ्या एका कृषी अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.देशमुखवाडी येथील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून शेततळ्यासाठीचे अनुदान मिळावे म्हणून कृषी विभागात चकरा मारत होता. मात्र, त्याला अधिकारी दाद देत नव्हते. अखेर अनुदान मिळण्यासाठी पाच हजारांची मागणी कृषी अधिकाऱ्याने केली. दोघात ठरलेल्या तडजोडीनंतर पाच हजार रुपयांची लाच त्या अधिकाऱ्याने कार्यालयातच घेतली. ती रक्कमकागदपत्राखाली ठेवली, असा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी कृषी आयुक्तांकडे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे
केली आहे.याबाबतचे निवेदन देशमुखवाडीचे राहुल दंडे, गजेंद्र बरबडे, तात्या काळे,अंबादास दंडे, रायचंद बरबडे, बापू माडगे, सुरेश मोढळे, सुनील बरबडे आदींनी दिले.प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा राशीन परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
याबाबत माहिती घेण्यासाठी कर्जत तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.