केरळमधील वायनाड येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदत आणि पुनर्वसन कार्यात नगर जिल्ह्यातील मेजर सीता शेळके यांचेही योगदान मिळते आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३१ तासांत १९० फुटांचा पूल तयार केला आहे. आता तो महाराष्ट्रासोबतच नगरच्याही कौतुकाचा विषय झाला आहे.
पारनेर तालुक्यातील भोंद्रे (टाकळी ढोकेश्वर) या मूळ गावातील सीता शेळके यांनी लष्करात अधिकारी होण्याची जिद्द बाळगली होती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्या अधिकारी झाल्या. सध्या त्या वायनाड जिल्ह्यातील मदत आणि पुनर्वसन कार्यात सहभागी झाल्या आहेत. पारनेरच्या शेळके कुटुंबातील बहुतांश सदस्य उच्चशिक्षित, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आहेत. सीता यांचे वडील अशोक शेळके वकील असून, ते येथील स्वामी समर्थ बँकेचे अध्यक्ष आहेत. मेजर सीता शेळके अभियांत्रिकी काम करणाऱ्या तुकडीच्या प्रमुख आहेत. केरळमधील कामासाठी त्यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. बंगळुरूमधील लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप या ७० जणांच्या पथकात त्या एकमेव महिला अधिकारी आहेत. https://x.com/satyajeettambe/status/1819680943827009934