लोकसभा निवडणुकांच्या निकालास एक दिवस बाकी असतानाच विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करत भाजपने चुरस वाढवली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने विद्यमान विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. तिथे भाजप पाठिंबा देईल, अशी साहजिकच मनसेची अपेक्षा असावी. मात्र त्यानंतरही पानसेंविरोधात डावखरेंना मैदानात उतरवले आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई शिक्षक मतदार संघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याही विरोधात भाजपने शिवनाथ दराडेंना तिकीट देत महायुतीतच एकी नसल्याचं निकालाच्या आदल्याच दिवशी दाखवून दिलं आहे.