आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही जागांवर युती आणि आघाडीतील नेत्यांची सहमती देखील झाली आहे. अशातच आता काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या किती जागा जिंकून येतील? तसेच किती जागांवर सहमती झाली आहे, याबाबत मोठे विधान केले आहे.
यावेळी थोरात म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत १२५ जागांवर सहमती झाली असून राहिलेले जागावाटप देखील लवकरच पूर्ण होईल. तसेच गणेशोत्सवानंतर चर्चा करून सर्वांच्या सहमतीने जागावाटप पूर्ण होईल. एमआयएमबाबत प्रस्ताव आल्याची मला माहिती नाही. मात्र, जे काही निर्णय होतील ते उच्च पातळीवर होतील, असे त्यांनी म्हटले.
तसेच आतापर्यंत आमच्या दोन-तीन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये १२५ जागांवर सहमती झाली आहे.तर इतर जागांवर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल.याशिवाय आमचे जागावाटप लवकरच पूर्ण होईल आणि राज्यात महाविकास आघाडीच्या १८० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
त्याबरोबरच सध्या महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नव्हे तर खऱ्याखुऱ्या लढती सुरू आहे. त्यांच्यात सगळ्यांना पुढे जायचे आहे, मागे जायला कुणीच तयार नाही. आमच्या जागावाटपात आम्ही देखील आग्रह धरू. मात्र, जो काही निर्णय असेल तो सहमतीनेच घेतला जाईल. महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? अशी चर्चा आम्ही कधीच करत नाही, असा टोलाही थोरात यांनी महायुतीला लगावला.