भीमा – गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा
पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता
अहमदनगर : पुणे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून अहमदनगर जिल्ह्यातही संततधार सुरू आहे.
त्यामुळे भीमा व गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदीच्या प्रवाहात उतरू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जीव डोक्यात घालून सेल्फी काढू नये. पुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडू नये.
अतिवृष्टी व संततधार पावसामुळे भूस्खलन तसेच दरडी कोसळण्याच्या शक्यता लक्षात घेऊन घाट रस्त्याने प्रवास करणे टाळावे. मेघगर्जना होत असताना झाडाखाली थांबू नये सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष टोल फ्री क्रमांक १०७७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राजेंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांनी केले आहे.