शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी मध्यस्थी करुनही विजय शिवतारे हे निवडणूक लढण्यावर ठाम असून आज (ता. २४ मार्च) झालेल्या बैठकीत त्यांनी १२ एप्रिल रोजी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
एकीकडे बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही कोणत्याही परिस्थितीत बारामतीमधून लोकसभा लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आम्हाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार पण नको आहेत. गावागावात सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन सांगा विजय शिवतारे ही निवडणूक लढणार आहेत. १ एप्रिलला पुरंदरच्या पालखी तळावर या लढाईचा बिगुल वाजवायचा आहे. पुरंदरमधील सर्वपक्षीय नेत्यांना एक एप्रिलच्या बैठकीला निमंत्रण देणार असल्याचे,” विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे.