Saturday, April 26, 2025

खासदार विखे पाटील साहेब तुमच्या मेंदूचा झालेला केमिकल लोचा आधी तपासून घ्या!

अहमदनगर (प्रतिनिधी): खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात दोन हात केले त्यांच्याच हातात हात घालून आज तुम्ही फिरत आहात ही सपशेल जनतेची फसवणूक नाही का ? स्वतः सर्जन असणारे खासदार सुजय विखे महानगर पालिकेच्या एम आर आय सेंटर चे उदघाटन करताना आपल्या विरोधकांचे मेंदू तपासण्याची भाषा करतात पण आमचा विरोध हा तुमच्या राजकीय स्वार्थी वृत्तीला आहे. तेव्हा तुमच्या मेंदूचा झालेला केमिकल लोचा आधी तुम्ही तपासून घ्यावा असा उपरोधिक सल्ला युवा सेनेचे प्रदेश विक्रम अनिलभैय्या राठोड यांनी दिला आहे.
अहमदनगर महानगर पालिकेच्या एम आर आय प्रकल्पाचे लोकार्पण करताना खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना विक्रम राठोड यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हिवाळी अधिवेशनातल्या आगमनाची चेष्टा करण्याइतकी राजकीय हैसियत तुम्ही प्राप्त केलेली नाही.
खासदारकीच्या निवडणुकीत तुम्ही ज्यांच्या विरुद्ध लढलात त्यांनाच घाबरून तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीत युतीचा धर्म तोडून त्यांनाच मदत केली. त्यात तुम्ही तुमची राजकीय सोय बघितली. आता विकास कामाच्या टक्केवारीत तुम्ही त्यांना भागीदार करून नको असलेले प्रकल्प तुम्ही नगरकरांच्या माथी मारत आहात.
विविध उपक्रमांच्या नावाखाली मोक्याच्या जागेवरील मनपाच्या मालिकेच्या जागांवर ताबा मारण्याचा सपाटा तुम्ही लावलाय. या वृत्तीला शिवसेनेने विरोध दर्शविला तर जाहीर भाषणातून तुम्ही याचा उल्लेख करून आम्हालाच आव्हान देत आहात.
नगर शहरात ५०० रुपयांत एम आर आय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तुम्ही देतात. मग मनपाच्या तुम्ही उदघाटन केलेल्या एम आर आय तपासणी केंद्रालाच ते का सुरु करीत नाहीत. त्यासाठी परत डॉ. विखे पाटील फाउंडेशन चे बॅनर कशासाठी हवे आहे.
नगरला धूळखात पडलेले आयुष्य आयुर्वेद रुग्णालय आपण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या उदघाटनाला शिर्डीत आले पण प्रत्यक्षात नगर जिल्ह्याला राज्य सरकारने देऊ केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण कोणत्या अधिकारात नाकारले. या नकाराला विळद घाटातल्या आपल्या मेडिकल कॉलेजच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो अशी पार्श्वभूमी होती का?
कोरोना काळात बेकायदेशीर पद्धतीने हेलिकॉप्टर ने रेम डेसीव्हर इंजेक्शन्स आपण आणलीत. त्या काळात नगरमध्ये त्यांनी या अत्यावश्यक इंजेक्शनचा बाजार मांडला. त्यासाठी न्यायालयाने आपल्याला फटकारले हा इतिहास आहे. आणि तो नगरकरांना माहित आहे.
केवळ राजकीय आणि आर्थिक सोय म्हणून विरोधकांना सोबत तुम्ही घेता. याद्वारे सहमतीचे राजकारण करीत असल्याचे सोंग तुम्ही घेता. केवळ स्वार्थापोटी हे तुम्ही करीत असल्याचे नगरकरांना कळले आहे.
पोकळ विकासकांच्या नावाखाली नगरकरांची चालवलेली फसवणूक नगरकर उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. या निवडणुकीत शिवसैनिक तुम्हाला तुमची जागा दाखवतील आणि तुम्हाला दक्षिणेतून पुन्हा उत्तरेचा रस्ता निश्चित दाखवतील असे राठोड यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles