अहमदनगर (प्रतिनिधी): उत्तर नगर जिल्ह्यात साखर वाटून दिवाळी साजरी करण्याबद्दल तुम्ही खुलासा करतात २२ जानेवारीला राम मंदिर खुले होताना दिवाळी आम्ही साजरी करणारच आहोत. परंतु तुम्ही तर नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचं दिवाळ काढले आहे आणि तुम्ही आम्हाला ३० वर्षांच्या विकासाचा हिशोब मागता?
या अगोदर ३० वर्ष नगरकर स्व.आ.अनिल भैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली भयमुक्त जीवन जगले. पण आज नगर खून,ताबेमारी, राजकीय साठमारी यामुळे बदनाम नगर झाले आहे. इकडे खासदारांचे सरकारी जागा हडपण्याचे ताबेमारीचे प्रकार सर्रास सुरु आहे. त्यामुळे ही ताबेमारी थांबवा अशी टीका युवासेनेचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव विक्रम अनिल भैय्या राठोड यांनी केली आहे.
मध्यंतरी विखे पिता पुत्रांनी उत्तर नगर जिल्ह्यात साखर वाटून साजरी केलेली दिवाळी यावर पत्रक काढून विक्रम राठोड यांनी खरपूस शब्दातटीका केली. त्यावर खुलासा देताना सुजय विखे यांनी राठोड यांचे नाव न घेता अनिलभैय्या यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीचा हिशोब मागितला. त्याला विक्रम राठोड यांनी पत्रक काढून उत्तर दिले आहे.
नगर शहरातील उड्डाण पूल असो की सीना नदीचा पूल असो दोन्ही पुलाला मंजूरी माजी खासदार दिलीप गांधी व माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या संयुक्त प्रयत्नातून मिळाली पण आज तुम्ही फक्त उद्घाटन करून आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचे काम करत आहात
तुम्हाला जेव्हा निवडणूक लढवायची होती तेव्हा तुम्ही देखील भयमुक्त नगरचा नारा दिला होता. दहशत, गुंडगिरीची उगमस्थान असलेल्या केडगावला बंगला घेऊन स्थायिक होण्याचे तुम्ही नगरकरांना कबुल केले होते. निवडून येण्यासाठी नगर शहराने आपल्याला खासदारकीच्या निवडणुकीत मताधिक्य द्यावे म्हणून तुम्ही पप्पांचे पाय धरण्यासाठी किती वेळा शिवालयाचे उंबरे झिजवले? हे सर्व नगरकर आणि शिवसैनिकांना माहित आहे आणि आता तुम्ही अनिलभैय्या यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीचा हिशोब मागताय याचा हिशोब अनिलभैय्यांवर प्रेम करणारे हजारो नगरकर येत्या 2024 च्या निवडणुकीत नक्कीच देतील असे विक्रम राठोड यांनी म्हंटले आहे.
मी अनिलभैय्यांचा मुलगा आहे मला सत्य बोलण्याची शक्ती, बुद्धी आणि हिंमत आई वडिलांच्या संस्कारातून मिळाली आहे. मला कुठलीही स्क्रिप्ट वाचण्याची गरज नाही मात्र तुम्ही जे बोलताय त्याची स्क्रिप्ट आयुर्वेद वरून लिहिली जातेय का ? असा प्रश्न संपूर्ण नगरकरांना पडला आहे
नगर शहरासाठी दक्षिण नगर जिल्ह्यासाठी तुम्ही काय केले ? उलट शहरात सध्या जनसेवा फाउंडेशन आणि विखे पाटील फाउंडेशन च्या माध्यमातून विविध प्रकल्प उभारण्याचा नावाखाली सरकारी जागा हडप करण्याचा सपाटा तुम्ही लावला आहे. सावेडीतील व्यापारी संकुलाची जागा मनपाकडून आरोग्य केंद्र चालविण्याच्याच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आली. आता त्याच इमारतीतील स्व. प्रमोद महाजन स्मृती वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्राच्या जागेवर आपला डोळा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीतुन ऑन लाईन उदघाटन झालेले, कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले १०० खाटांचे आयुष रुग्णालय कर्मचाऱ्याविना धूळखात पडून आहे. त्या उदघाटनासाठी जरी पंतप्रधान नगर शहरात आले असते तरी नगरचे किमान रस्ते सुधारले असते. आणि या आयुष रुग्णालयाची नगरकराना काय गरज होती? त्यापेक्षा नगर मध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणे अपेक्षित होते. मात्र आपल्या विळद घाटातल्या विखे पाटील फाउंडेशन च्या खाजगी मेडिकल कॉलेज च्या प्रवेशावर आणि व्यवसायावर याचा परिणाम होईल म्हणून की काय राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा केली पण त्या यादीतून नगर चे नाव सपशेल पणे गाळण्याची सूचना कोणी केली ? याचा शोध नगरकर निवडणुकीत निश्चित घेतील.
केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला सैनिक स्कुल दिले. त्यात राज्यात दरवेळी प्रवरा पब्लिक स्कुल चाच नंबर का लागतो. बर असे सैनिक स्कुल लोणी ऐवजी विळद घाटात का सुरु करीत नाहीत? असा सवाल राठोड यांनी विचारला आहे.
मनपा आयुक्तांवर शाई आणि बूट फेकण्याचा विषय तुम्ही काढता मग विळद घाटातील आपल्या संस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी मुळा धरणातून येणाऱ्या मुख्य पाईप लाईनला किती टॅब तुम्ही बेकायदेशीर पणे मारले. आणि नगरचा पाणी पुरवठा विस्कळीत केला. जणू केंद्राची अमृत योजना नगर चा पाणी प्रश्न संपविण्यासाठी नव्हतीच तर विळद घाटातील विखे पाटील फाउंडेशन च्या प्रकल्पांच्या टाक्या भरण्यासाठी होती. अशा अविर्भावात आपण वागलात. आणि या प्रकल्पांची थकलेली ४ ते ५ कोटी रुपयांची पाणी पट्टी आपण कवडीमोल आकारण्यासाठी मनपा आयुक्तांवर आपल्या यंत्रणेने आणलेला दबाब लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसतो? असे राठोड यांनी विचारले आहे.
ज्यांच्या विरुद्ध तुम्ही खासदारकीच्या निवडणुकीत दोन हात केले त्यांनाच सोबत घेऊन तुम्ही विकास कामाच्या नावाखाली येणाऱ्या टक्केवारीतील रबडी आपसात वाटून घेत आहेत. तुम्हीच त्यांना घाबरून त्यांच्या सोबत व्यासपीठ शेअर करीत आहात. आपल्या परवानगी शिवाय नागरच्य पुला पर्यंत यायचे नाही हा आयुर्वेदाचा आदेश शिरसावंद्य मानून तुम्ही त्यांना सोबत घेतल्याशिवाय एकही कार्यक्रम करू शकत नाहीत मग खरे दशतीखाली कोण आहे हे नगरची जनता जाणते.
तुम्ही सरकारी जागा हडप करण्याचा सपाटा लावलाय. नगरकर या कृत्यापासून अनभिज्ञ आहेत असे समजू नका येणाऱ्या निवडणुकीत सुजय यांना पराजयाचा साक्षात्कार नगरची जनता आणि शिवसैनिक घडवतील यात आम्हाला कोणतीच शंका वाटत नाही.
30 वर्षे नगरकर स्व.अनिलभैयांमुळे भयमुक्त जगले, तुम्ही नगर दक्षिणेचे दिवाळं काढलं…खा.विखेंना जोरदार प्रत्युत्तर
- Advertisement -