पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. यामागे मोठं कारणंही समोर आलंय. 50 किलो कुस्ती स्पर्धेत फक्त 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र करण्यात आलंय. त्यामुळे तिला फायनलमध्ये भाग घेता येणार नाही.
त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, अपात्र ठरवल्याने विनेश फोगटला सिव्हर मेडल देखील मिळणार नाही. या बातमीने कोट्यवधी भारतीय नाराज झाले आहेत. विनेश फोगाटने वर्ल्ड चॅम्पियन महिलेला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली होती.
विनेशच्या या कामगिरीने कोट्यवधी भारतीय आनंदीत झाले होते. अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावर देखील केला. आता विनेश फायनल सामना जिंकून भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड नक्कीच मिळवणार अशी क्रीडाप्रेमींना आशा होती. मात्र, फायनल सामन्यापूर्वी विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आलंय.विनेश फोगटला अपात्र ठरवण्याचा वृत्ताला खुद्द भारतीय ऑलिम्पिक संघटनेनेच दुजोरा दिला आहे. फायनल सामना सुरू होण्याआधीच आज सकाळी विनेशचे वजन करण्यात आले. यावेळी तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम अधिक भरले. म्हणूनच तिला अपात्र घोषित करण्यात आल्याचं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने म्हटले आहे.