मनोज जरांगे पाटील राज्यभरात फिरून जाती-जातीत वाद निर्माण करीत आहेत. आपल्या भाषणातून ते सर्वत्र द्वेष पसरवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी दुटप्पी भूमिका घेणे थांबवली पाहिजे, अन्यथा उद्या त्यांच्यावरही चप्पलफेक होऊ शकते, असा इशारा भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांना दिला आहे.
आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आम्ही देखील सहमत आहोत. पण त्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन झालं पाहिजे, असंही विनोद वाघ यांनी म्हटलं आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेकीचा निषेधही विनोद वाघ यांनी केला आहे. पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मी निंदा करतो. हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी देखील वाघ यांनी केली आहे.
त्याचबरोबर आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाली. मात्र, उद्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर ही चप्पलफेक होऊ शकते, असा इशारा देखील विनोद वाघ यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे.