अहमदनगर-जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सतत पडणारा पाऊस, वाढलेले गवत यातून वाढलेली डासांची उत्पत्ती यामुळे विषाणूजन्य आजार असणार्या डेंग्यू, चिकनगुणीया, झिका रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णालये, दवाखाने खचाखच भरलेली आहेत. शासकीय आरोग्य विभाग देखील सतर्क झाले असून नागरिकांनी ताप, अंगदुखी यासह अन्य समस्या निर्माण झाल्यास नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या महिनाभरात व्हायरल आजारांसह डेंग्यू, चिकनगुणीया, झिका रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब आजारी पडत असून तिव्र स्वरूपाच्या तापासह अंग, सांधे दुखी, घसा दुखी, खोकला यासह निमोनियासदृश आजारांचा विळखा वाढला आहे. सध्या गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने ढगाळ वातावरण, सोसाट्याचा गार वारा, सततचा पाऊस, सर्वत्र साचलेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. यामुळे थंडीतापासह व्हायरल, डेंग्यू, चिकनगुणीया, चिकनगुणीया सदृश रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
जिल्ह्यात सध्या 158 जणांना डेंग्यूची बाधा झाल्याची शासकीय आकडेवारीत नोंद असून खासगी रुग्णालयांत उपचार घेणारे किंवा घेवून बरे झालेल्यांची संख्या याच्या दहापट अधिक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नगरमध्ये अनेक रुग्णालयांत सध्या व्हायरलसह डेंग्यू आणि चिकनगुणीयावर उपचार घेण्यासाठी जागा शिल्लक नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच साथ असणार्या गावात जिल्ह्यात अनेक गावात सध्या फॉगींगसह अन्य उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून तापाचे रुग्ण असणार्या गावात तातडीने सर्वेक्षणासह अन्य उपाययोजना राबवण्यात येत आहे. नागरिकांनी देखील शहरासह ग्रामीण भागात पावसाचे पाणी साठणार नाही. त्यातून डासांची उत्पत्ती होणार नाही, यावर लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणाही ताप साधा, व्हायरल की अन्य कोणता हे मनाने ठरवून नयेत. वैद्यकीय सल्ला घेवून उपचार करावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.
जिल्ह्यात जिल्ह्यात 940 जण संशयीत डेंग्यूचे रुग्ण होते. यातील 158 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले असून यातील 101 ग्रामीण भागातील असून नगर मनपा हद्दीतील 52, भिंगार छावणी परिषद हद्दीतील 1, तर उर्वरित 4 अन्य जिल्ह्यातील रुग्ण आहे. नगर तालुक्यात 16, श्रीगोंदा 4, कर्जत 1, जामखेड 2, पाथर्डी 3, शेवगाव 7, नेवासा 16, राहुरी 7, श्रीरामपूर आणि राहाता प्रत्येकी 1, कोपरगाव 7, संगमनेर 14, अकोले 8, पारनेर 14 अशा 101 रुग्णांचे शासकीय प्रयोग शाळेतील डेंंग्यूचे अहवाल बाधित आलेले आहेत.
जिल्ह्यात शासकीय आरोग्य संस्थांनी केलेल्या तपासणीत 34 जणांना चिकनगुणीया झाल्याचा संशय व्यक्त होत होता. यातील 19 जणांचे अहवाल बाधित आलेले आहेत. यासह नवीन विषाणू असणार्या झिकाचे 323 संशयी रुग्ण होते. यातील 11 जणांचे अहवाल बाधित आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या 319 गर्भवती महिलांच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर 10 महिला झिकाने बाधित असल्याचे समोर आले आहे. या सर्वाची प्रकृती चांगली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
तापासह अंग दुखी असणार्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानूसार उपचार करावेत. मनाने औषधे घेवू नयेत, वेळीच डेंंग्यूचे निदान झाल्यास डेंग्यूवर मात करता येणे शक्य आहे. नागरिकांनी विषाणूजन्य आजारांसाठी कारणीभूत असणारी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, पावसाचे पाणी घराच्या परिसारात साचणार नाही, याची दक्षता घ्यावी.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी.