टिम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तब्बल १२ वर्षांनी पुनरागमन होणार आहे. गुरुवारपासून रेल्वेविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या साखळी लढतीत तो दिल्ली संघाकडून खेळताना दिसणार आहे. हा सामना पाहण्यासाठी १० हजारहून अधिक प्रेक्षक दिल्लीच्या फिरोझ शाह कोटला स्टेडियमवर उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमाविल्यानंतर ‘बीसीसीआय’ने कठोर पावले उचलताना आपल्या सर्व करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धा खेळणे बंधनकारक केले. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांसारख्या नामांकित खेळाडूंनी रणजी स्पर्धेच्या गेल्या सामन्यांत सहभाग नोंदवला. कोहलीने मात्र मानेच्या दुखापतीमुळे सामना खेळणे टाळले. परंतु आता त्याचे दशकभराहूनही अधिक काळानंतर दिल्ली संघात पुनरागमन होणार आहे.
कोहलीला गेल्या वर्षी खेळलेल्या १० कसोटी सामन्यांच्या १९ डावांत केवळ एक शतक आणि एक अर्धशतक करता आले. त्याने २४.५२च्या सरासरीने अवघ्या ४१७ धावा केल्या. विशेष म्हणजे कोहलीला २०१८ सालानंतर कसोटी क्रिकेटमध्ये केवळ तीन शतके करता आली आहेत.
विराट भाई चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. त्याने आम्हाला सकारात्मक मानसिकता राखून खेळण्याचा सल्ला दिला आहे,’’ असे दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनी याने सांगितले.
विराट कोहलीप्रमाणेच भारताचा आघाडीच्या फळीतील फलंदाज केएल राहुलही बऱ्याच वर्षांनंतर रणजी स्पर्धेत सहभाग नोंदविणार आहे. हरियाणाविरुद्धच्या सामन्यात तो कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करेल. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळणे अपेक्षित आहे..






