अखेर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता संपली आहे. भाजपकडून छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात मोठा आदिवासी चेहरा मानल्या जाणाऱ्या विष्णुदेव साय यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले. राजस्थान, मध्यप्रदेश सह छत्तीसडमध्येही भाजपने सत्ता खेचून आणली. निवडणूकीतील विजयानंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता लागली होती.
अखेर सात दिवसानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आदिवासी समुदायातून येणारे विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळताना दिसतील. आदिवासी समाजाचा योग्य सन्मान केला जाईल, असे भाजपने याआधीच स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे भाजपकडून राज्यात सर्वात मोठा समुदाय असलेल्या आदिवासींचा विचार करत हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.