अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गुरुवारी दोन गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. सदर गोळीबार प्रकरणामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी विवेक कोल्हे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला होता. यावेळी राज्याचे गृहखाते आणि पोलीस प्रशासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत निवेदन देखील देण्यात आले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे गोळीबार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत असल्याचा विवेक कोल्हे यांनी गंभीर आरोप केला आहे. तर काळेंसोबतच त्यांच्या स्वीय सहाय्यकालाही यासाठी जबाबदार धरले आहे. यासंदर्भातली फोटो आणि व्हिडिओ सुद्धा त्यांनी माध्यमांसमोर दाखवले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नाझिम शेख हा आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता असून आरोपींना आमदार काळेंचे पाठबळ आहे, असे विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे. गोळीबारात जखमी तन्वीर रंगरेज याचा व्हायरल व्हिडिओ दाखवत कोल्हेंनी हे गंभीर आरोप केले. तर आरोपींनी आमदार आशुतोष काळेंसोबत सोशल मीडियावर स्टेटस ठेवले असल्याचे देखील कोल्हे म्हणाले आहेत.