नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांच्या धाडी पडली होती. तीन वेळा शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध प्रकारच्या धाडी टाकल्या होत्या. विविध शासकीय पथके कोपरगावात येऊन कोल्हे यांच्याबाबत चौकशी करत असल्याने जनसामान्यांत विविध चर्चा रंगल्या होत्या. आता या प्रकरणावर खुद्द विवेक कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात भाजपतून बंडखोरी करत विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते माघारीपर्यंत कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाडसत्र सुरू करण्यात आले. साखर कारखाना, शैक्षणिक संकुल यासह विविध संस्थांवर राज्यातील पथकांनी धाडी टाकत कागदपत्रांची तपासणी केली. या धाडसत्रानंतर विवेक कोल्हे यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट करताना मतदार आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास व्यक्त केलाय.
ते पुढे म्हणाले की, किशोर दराडे यांच्यावर 420 बरोबरच खुनासारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. साखर कारखाना निर्मितीसाठी शेअर्स वाटून दोन कोटी गोळा केले त्याचीही चौकशी करावी. गेल्या साठ वर्षांत आमच्यावर फक्त राजकीय गुन्हे दाखल आहेत. काल माघारीच्या दिवसापर्यंत हे धाडसत्र सुरू होतं. हे राजकीय प्रेरित असेल तर त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारा हा प्रकार असून असे प्रकार केले तर युवा वर्ग कधीही राजकारणात येणार नाही. दबावतंत्राचा भाग म्हणून हे धाडसत्र सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काळ जरी कसोटीचा असला तरी आमचा वारसा संघर्षाचा आहे.