अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.१३) मतदान झाले. यात सायंकाळी उशीरापर्यंत काही तालुक्यांतील मतदान केंद्रांवर मतदान सुरू राहिल्याने मतदानाची सरासरी, त्यानंतर मंगळवारी सकाळी अंतरिम आणि मंगळवारी रात्री अंतिम आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली. यात नगर लोकसभेसाठी ६६.६१ टक्के मतदान झाले असून यात सर्वाधिक मतदान हे पारनेर विधानसभा मतदारसंघात ७०.१३ आणि सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात ६२.५० झालेले आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यावतीने देण्यात आलेल्या आकडेवारीत गत पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा नगर लोकसभेसाठी १.२ टक्के मतदान कमी झाले असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, त्यानंतर रात्री देण्यात आलेल्या आकडेवारीत नगर लोकसभेसाठी ६६. ६१ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
या मतदारसंघात १९ लाख ८१ हजार ८६६ मतदार असून यापैकी १३ लाख २० हजार १६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ही ६६.६१ टक्के असल्याचे सांगण्यात आले. यात सर्वाधिक मतदान पारनेर विधानसभा मतदारसंघात ७०. १३ टक्के झाले असून सर्वात कमी मतदान नगर शहरात ६२.५० टक्के झाले आहे. यंदा मागील पंचवार्षिकच्या तुलनेत १ लाख ५० हजार ३२९ मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मागील पंचवार्षिकला मतदारसंघात ६४.७९ टक्के मतदान झाले होते. यंदा अंतिम आकडेवारीत मतदारसंघातील ७ लाख २१ हजार ३२७ पुरुष मतदारांनी तर ५ लाख ९८ हजार ७९० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
शेवगाव २ लाख २७ हजार ६६६ (६३. ३ टक्के),
राहुरी २ लाख १८ हजार २३५ (७० टक्के),
पारनेर २ लाख ३९ हजार १२४ (७०. ३३ टक्के),
नगर शहर १ लाख ८८ हजार ७९५ (६२. ५० टक्के),
श्रीगोंदा २ लाख २३ हजार ३५२ (६७. ९० टक्के)
कर्जत-जामखेड २ लाख २२ हजार ९९६ ( टक्के ६६ . १९ टक्के)
एकूण मतदान १२ लाख ६३ हजार ७८१ झालेले असून टक्केवारी ६३.७७ टक्के आहे.
मतदानात २ टक्क्यांनी वाढ
नगर लोकसभा मतदारसंघात यंदा मतदान टक्केवारीत २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील पंचवार्षिकला या मतदारसंघात ६४.७९ टक्के मतदान झाले होते. यंदा मोठे प्रयत्न करून ही अवघी २ टक्के वाढ झाली आहे.