बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून अटक असलेल्या वाल्मीक कराडच्या मुलाचा प्रताप समोर आला आहे. वाल्मीक कराड याच्यानंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हा देखील अडचणीत आला आहे. वाल्मीक कराडच्या मुलाच्या विरोधात सोलापूर न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना सुशील कराड विरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना न्यायालयाने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सुशील कराड याने एका मॅनेजरच्या घरात घुसून लूट केल्याची तक्रार असल्याचे अर्जात म्हटलं आहे. दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोनं लुटल्याची तक्रार सुशील विरोधात आहे. त्यामुळे आता मुलगा सुशील कराडवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. सुशील कुमारकडे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची लूट केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. मूळचे सोलापूरचे असलेली ही व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करत असताना सुशील कराडने त्यांची संपती लुटली. तुम्ही आमची संपत्ती लुटली असा आरोप करत सुशील कराडने मारहाण करत आणि रिव्हॉलवरचा धाक दाखवत आपली संप ताब्यात घेतली, असा आरोप मॅनेजरने केला. बीड आणि सोलापूर पोलिसांवरही या मॅनेजरने आरोप केले आहेत. पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने आम्ही सोलापूर न्यायालयात अर्ज दाखल करत असल्याची माहिती तक्रारीद्वारे दिली आहे.
सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली आहे. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे मॅनेजरच्या पत्नीने कोर्टाते दार ठोठावले आहे. पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. त्यावर आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून 13 जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. सुशील कराडवर केलेल्या आरोपबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.