अहिल्यानगर-जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्या जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. 2 डिसेंबर पासून प्रभाग रचनेला प्रारंभ होणार आहे. तर अंतिम प्रभाग रचना 24 जानेवारीला प्रसिध्द करण्यात येणार आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कोकणगाव, मांडवगण, महांडूळवाडी, राजापूर, दानेवाडी या सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पारनेर तालुक्यातील मसे खुर्द व राळेगाव थेरपाळ, संगमनेर तालुक्यातील काकावाडी व नान्नज दुमला या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अकोले तालुक्यातील साकीरवाडी व दिगंबर तर कर्जत तालुक्यातील कोळवडी, बनवडी या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अशा एकूण जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायत प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे.
दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्या 84 ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना, मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. विधानसभा निवडणुक व सरपंच आरक्षणा अभावी या निवडणुका अद्याप ही झाल्या नाहीत. येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे.