Saturday, December 9, 2023

दोन दिवसांपासून जोरदार पाऊस ,राज्यात कसा असेल परतीचा पाऊस?

राज्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. धरणांमधील पाणीसाठा काहीसा वाढल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले असले तरी हवामान विभागाचा अंदाज व तज्ज्ञांच्या अंदाजानुसार परतीचा पावसाची स्थिती नक्की काय असेल? जाणून घेऊया…

भारतीय हवामान विभागाने (IMD) नैऋत्य मॉन्सून भारतातून २५ सप्टेंबर पासून माघार घेण्यास सुरुवात करेल असा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचा हंगाम अधिकृतपणे 30 सप्टेंबर रोजी संपेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

“वायव्य भारतावर कमी उष्णकटिबंधीय पातळीवर विकसित होणाऱ्या चक्रीवादळ विरोधी प्रवाहामुळे आणि नैऋत्य राजस्थानच्या काही भागांमध्ये कोरडे हवामान असल्याने पश्चिम राजस्थानच्या काही भागांमधून नैऋत्य मान्सून 25 सप्टेंबर पासून माघार घेण्यास अनेक अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.”- हवामान विभाग

एरवी नैऋत्य मान्सून 17 सप्टेंबर पर्यंत पश्चिम राजस्थान मधून बाहेर पडण्यास सुरुवात होते व सप्टेंबर अखेरीस संपूर्ण उत्तर व वायव्य भारतातून मान्सून बाहेर पडतो. पण हवामान विभागाने केलेला परतीच्या मान्सूनचा हा अंदाज प्रत्यक्षात आल्यास मान्सूनच्या पारंपरिक माघारी फिरण्याच्या तुलनेत ८ दिवसांचा विलंब होईल.

भारताच्या उत्तर आणि वायव्य भागातून मान्सूनने माघार घेतल्यानंतर पूर्व ईशान्य व मध्य भागातून मान्सूनची परतीची वाटचाल सुरू होईल. ही वाटचाल अंदाजे अर्धा महिना म्हणजेच 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल आणि शेवटी पाऊस दक्षिणेकडील प्रदेशांना अंतिम निरोप देईल.

एकीकडे हवामान विभागाचा परतीचा पावसाचा असा अंदाज असताना महाराष्ट्रात परतीच्या पावसाची शक्यता अतिशय कमी असल्याचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, “परतीचा पाऊस हा दरवर्षी एक सप्टेंबर पासून सुरू होतो. आता पावसाळा संपायला अवघे दहा दिवस राहिले आहेत. आतापर्यंत परिस्थिती गंभीर आहे. एव्हाना परतीच्या पावसाचा काही ना काही परिणाम दिसायला हवा होता. अल निनोच्या प्रभावामुळे पुढच्या आठवड्यातही हा प्रभाव दिसणार नाही. परतीच्या पावसाचा जोर राहणार नाही. हवेचा दाब वाढला आहे त्यामुळे राज्यात किंबहुना मराठवाड्यातही हा जोर नसेल. ”

परतीचा पाऊस राज्यभर कमी राहणार आहे. एरवी ज्या भागात ज्या प्रमाणात तो येतो तेवढाही यंदा नसेल अशी शक्यता रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली. मराठवाड्यात आत्तापासून गंभीर परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. येणाऱ्या काळात राज्यात पाण्याचे मोठे प्रश्न उभे राहणार आहेत अशी चिंता ही त्यांनी व्यक्त केली.

राज्यभरात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झालेली दिसून येत असली तरी शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी परतीच्या पावसावर भिस्त आहे.

मागील चार वर्ष दुष्काळ, दोन वर्ष गारपीटी, एक वर्ष चांगल्या पावसाचे झाल्यानंतर आता मराठवाडा पुन्हा एकदा दुष्काळाचा उंबरठ्यावर येऊन थांबला आहे. एकीकडे कोरड्या पडलेल्या विहिरी, हातातून गेलेली खरीप पिके, राज्यात झालेला पावसाचा खंड या पार्श्वभूमीवर केवळ परतीच्या पावसावर अवलंबून राहावे असे वातावरण नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय आशिया प्रशासकीय संस्थेने जानेवारी महिन्यात दिलेल्या अंदाजानुसार आशिया खंडात यावर्षी दुष्काळ असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑगस्ट महिना हा शतकातील कोरडा महिना असल्याचे आंतरराष्ट्रीय संस्था सांगत आहेत. टोकाचे हवामान बदल, अल निनो, ला नीनाचे प्रभाव होत असताना केवळ शेतकरीच नाही तर जगभरातील प्रत्येकाला येणाऱ्या काळात मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते असे तज्ज्ञांकडून कडून सांगण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d