पुणे रोडवरील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात एका सुनावणीच्या कामकाजात अडथळा न आणता मदत करण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने मंगळवारी (दि. १) रंगेहाथ अटक केली. मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यास नाेंदणी कार्यालयातील न्याय लिपिक सुमंत सुरेश पुराणिक (४०, रा. श्री निधी बंगला, डीजीपीनगर-१, रायन स्कुलजवळ, पुणे रोड), लघुलेखक संदीप मधुकर बाविस्कर (४७, रायगड चौक, सिडको) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदारांकडे नवीन दाखल फाईलच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणुक न करणे, निकाली फाईल नकला विभागाला विहीत वेळेत पाठविणे, पुढील सुनावणीचे कामकाजात अडथळा न आणता कामकाज जलद गतीने करुन देण्याची जबाबदारी आहे.
यातील काही कामांच्या मोबदल्यात पुराणिक याने २३ सप्टेंबर रोजी २० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती १५ हजार लाच देण्याचे ठरले. यासाठी लाच मागणीस लघुलेखक बावीस्कर याने प्रोत्साहन दिले, असे समाेर आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत,पोलीस निरीक्षक नितीन पाटील,पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे यांच्या पथकाने केली.