अहमदनगर – सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग शिक्षकांच्या तपासणीसाठी वारंवार निवेदन देऊन आग्रह धरला जात आहे. दिव्यांग शिक्षकांना नाहक तपासणीला सामोरे जावे लागत असून आधीच निसर्गाने अन्याय केलेल्या व्यक्तींवर प्रशासनही अन्याय करते की काय ? अशी शंका येते. जिल्हा परिषदेकडून अनेक शिक्षकांना सध्या ससून हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पत्र दिले जात आहे. मात्र जे नैसर्गिक अपंग आहेत व ज्यांच्याकडे अनेक वेळा तपासणी केल्याचे त्रीसदस्यीय प्रमाणपत्र आहे, अश्याही शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ससून हॉस्पिटलमध्ये एका हेलपाट्यात हे प्रमाणपत्र मिळत नाही व सदर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अपंगांना अनेक विभागांमध्ये तपासणीसाठी जाणे त्रासाचे ठरत आहे. तसेच ज्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये तपासणी करून प्रमाणपत्र आणले ,त्यांच्यावर सुद्धा या कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे. सध्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या बाबतीत कोणीही निवेदन देऊन बोगस दिव्यांग शिक्षकांची तपासणी करण्याची मागणी करत आहे.मात्र प्रशासनाने खरा किंवा खोटे दिव्यांग कोण याची शहानिशा करून जे शंकास्पद दिव्यांग आहेत, त्यांनाच तपासणीसाठी पाठवावे, अशी मागणी दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. साहेबराव अनाप यांनी केली आहे.
यापूर्वी ज्यांना मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन मिळाले त्यांची तपासणी ससून हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. असे असताना कोणाच्याही मागणीवरून त्यांना पुन्हा तपासणीचा आग्रह का धरण्यात येतो ? हे न उलगडणारे कोडे आहे. याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. आंदोलनकर्त्यांचा त्रास वाचवण्यासाठी शिक्षकांना तपासणीचा आग्रह धरण्यात येत असल्याची शंका खऱ्या दिव्यांग शिक्षकांमध्ये पसरली आहे. दिव्यांग मध्ये अस्थिव्यंग, कर्णबधिर, अल्पदृष्टी, बहुविकलांग सह अनेक प्रकार आहेत.
ज्या कर्मचाऱ्यांकडे त्रिसदस्यीय समितीचे प्रमाणपत्र आहे व ज्यांचे अपंगत्व कायम असेल ,अशा कर्मचाऱ्यांची पुन्हा पुन्हा तपासणी करण्याची शासन निर्णयानुसार गरज नाही. तरी त्यांचीही वारंवार तपासणीसाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठविले जात आहे. खऱ्या दिव्यांगाना वारंवार पुन्हा तपासणीला पाठवल्यास आमरण उपोषणाचा इशारा राज्यसह कोषाध्यक्ष श्री.संतोष सरवदे यांनी दिला आहे.
यापूर्वी ज्यांची तपासणी ससून अथवा इतर हॉस्पिटल मध्ये अनेक वेळा झाली आहे व त्यांना त्रिसदस्यीय समितीने कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे,त्यांची स्वतंत्र यादी करून त्यांना पुन्हा तपासणीसाठी पाठवू नये- साहेबराव अनाप, जिल्हाध्यक्ष अपंग कर्मचारी संघटना
यावेळी दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर कार्याध्यक्ष राजू आव्हाड, राजेंद्र औटी,बन्सी गुंड, सुखदेव ढवळे, साहेबराव मले,विलास सावंत, संध्या जपकर मॅडम,राजेंद्र ठूबे, राधाकिसन शिंदे,अनिल ओहोळ, विजय अंधारे, किरण माने,भारत तोरमल, अजय लगड, सचिन रनाते, मनोहर भालेराव, रावसाहेब तांबे, श्रीकांत देवरे, विष्णू बोडके, सुनिता आंबरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.