यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम पतीने सासरवाडीत जाऊन चौघांची हत्या केली आहे. जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा गावात मंगळवारी (१९ डिसेंबर) रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पंडित भोसले (सासरा) सुनील पंडित भोसले (मेहुणा) ज्ञानेश्वर पंडित भोसले (मेहुणा), रेखा गोविंदा पवार (पत्नी) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर रुखमा पंडित भोसले या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याप्रकरणी पोलिसांनी नराधम जावयाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोविंदा वीरचंद पवार (रा. कळंब), असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गोविंदा याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.
त्यावरून त्याचे पत्नीसोबत भांडण झाले होते. भांडनानंतर आरोपीची पत्नी माहेरी निघून गेली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने मंगळवारी रात्री ११ वाजता थेट सासरवाडी गाठली. तिरझडा गावात गेल्यानंतर आरोपीने बायको, सासू-सासरे आणि दोन मेहुण्यांची निर्घृणपणे हत्या केली.
चौघांची हत्या केल्यानंतर आरोपी गोविंदा फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.