पालघरमधून अजब प्रकार समोर आला आहे. पालघर रेल्वे स्थानकामध्ये असणाऱ्या तिकीट घरामध्ये सुरू असलेलं कामकाजाचे लेखा परीक्षण करण्यासाठी नेमलेल्या महिला अधिकाऱ्याऐवजी त्यांच्या नवऱ्याने काम केल्याचा प्रकार पालघरमधून समोर आला आहे.
या प्रकारानंतर वरिष्ठांनी या पालघर रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. मात्र, सहा तासानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे समोर आले आहे
पालघर रेल्वे स्थानकातील सेंट्रल बुंकिंग कार्यालयात सकाळी नऊ वाजता ऑडिटर असल्याचे सांगून एका व्यक्तीने प्रवेश केला. त्यानंतर या व्यक्तीने कार्यालयात येऊन सर्व कागदपत्रांची झाडझडती घेतली. या व्यक्तीच्या वर्तवणुकीवर संशय आल्याने कार्यालयातील कर्मचारी सजग झाले. त्यानंतर वाणिज्य निरीक्षकांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली.वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिल्यानंतर लेखापरीक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती महिला असल्याची माहिती मिळाली. तर या महिला अधिकाऱ्याच्या ऐवजी पती काम करत असल्याचे समोर आले. त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पालघरच्या स्टेशन व्यवस्थापकाला तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, ही घटना उघडकीस झाल्यानंतर या महिला अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते आहे.
तत्पूर्वी, आरपीएफने या तोतया कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले होते. या व्यक्तीला रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरिक करण्यात येईल. त्यासाठी तक्रार दाखल करून प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, रेल्वे पोलीस जीआरपी यांनी या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी कोणीही समोर आलेले नाही.
तसेच या प्रकरणात सहा तास उलटूनही कोणतीही फिर्याद नोंदविण्यात आली नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात फिर्याद दाखल केल्यानंतरच तपशील जारी करणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.